मद्यधुंद दुचाकीस्वाराची पोलिसांच्या वाहनाला धडक

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मद्यधुंद अवस्थेत भरधाव दुचाकी चालवणाऱ्या युवकाने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर घडली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ५ मे रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. शेख आसिफ शेख रशीद (वय ३७, रा. संजयनगर, बायजीपुरा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सिटीचौक पोलिस ठाण्यासमोरील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी मदन डोंभाळ आणि विशाल दांडगे हे सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर मोबाइल व्हॅनसह पेट्रोलिंग ड्युटीवर होते. त्यावेळी शाहगंजकडून भडकलगेटच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत पोलिसांच्या वाहनाला मागून
धडक दिली.
घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. वैद्यकीय अहवालात त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो मद्याच्या अमलाखाली वाहन चालवत असल्याचेही स्पष्ट झाले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions